गुन्हा दाखल केल्याच्या रागातून माजी महापौर डब्बू आसवानींच्या मुलावर हल्ला

0
448

पिंपरी, दि ४ (पीसीबी) – साथीदारांवर गुन्हा दाखल केल्याच्या रागातून चौघा जणांच्या टोळक्यांनी माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या मुलावर हल्ला करत त्यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळील वाहनांची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. २) रात्री साडेतीनच्या सुमारास पिंपरी कॅम्प येथे घडली.

याप्रकरणी अमित हिरानंद आसवानी (वय २३, रा. शनिमंदिरासमोर पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कृष्णा उर्फ बॉक्सर (रा. मिलिंदनगर, पिंपरी), व्यंकटेश नाईक, आदित्य साळवे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित हा माजी उपमहापौर डब्बू उर्फ हिरानंद आसवाणी यांचा मुलगा आहे. अमित रविवारी रात्री व्हॉलीबॉल खेळण्यासाठी पिंपरीतील शास्त्रीनगर येथे गेला होता. तेथून माघारी आल्यानंतर तो घराच्या गेटवर उभा असताना आरोपी हातात लोखंडी रॉड घेऊन त्या ठिकाणी आले. ‘आमच्या सचिन व सनी भाईच्या विरोधात तक्रार करतो का, तुम्हाला बघून घेतो, त्या डब्याला खल्लास करतो’ असे बोलून आरोपी गेटजवळ आले.

यावेळी एकाने हातातील रॉड अमितच्या दिशेने भिरकावला. अमितने कसाबसा ‘रॉड’ हुकवून तेथून पळ काढला. अमित पळून गेल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत गेटमधील वाहनांची तोडफोड केली. तसेच हातातील रॉडने गेटवरील लाकडी पट्ट्या तोडून नुकसान केले. तसेच परिसरातील नागरिकांना धमकावले. दरम्यान आरोपींचा साथीदार सचिन राकेश सौदाई (वय ३३, रा. विजयनगर, काळेवाडी) याचे २५ मार्च रोजी पिंपरी कॅम्प येथे दारू खरेदीच्या कारणावरून डब्बू आसवानी यांच्यासोबत भांडण झाले होती. याप्रकरणी आसवानी यांच्यावर ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सचिन याच्यावर जिवघेणा हल्ला केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.