विद्युतपंप लावून बेकायदा पाणी घेणाऱ्या काळेवाडीतील १७ नळजोडधारकांवर कारवाई

0
630

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – थेट नळजोडांना विद्युतपंप लावून बेकायदा पाणी घेणाऱ्या नळजोडधारकांवर  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. काळेवाडीतील पवनानगर परिसरात सोमवारी १७ नळजोडधारकांचे पंप जप्त करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीकपात सुरू केली आहे. तर दुसरीकडे शहरात बेकायदेशीररीत्या विद्युत पंप थेट नळजोडांना लावून पाणी घेतले जात आहे. नागरिकांकडून  पाण्याचा अपव्यय होत आहे.

असे प्रकार रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने भरारी पथके कार्यान्वित केली आहेत. अशा प्रकारे नळजोडांस विद्युत पंप जोडून पाणी घेत असल्याचे आढळून आल्यास विद्युत पंप कायमस्वरूपी जप्त केली जातील, असा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

दरम्यान, नागरिकांनी पाणी जमिनीखालील टाकीमध्ये साठवून ठेवावे. त्यानंतर पंपाने पाणी इमारतीवरील टाकीमध्ये टाकावे. ज्या नागरिकांना जमिनीखाली टाकी नाही, त्यांनी आवश्यक क्षमतेची जमिनीखालील पाण्याची टाकी बांधून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.