गुजरातमध्ये १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार झाल्यामुळे यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलन

0
497

गुजरात, दि. (पीसीबी) – गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका १४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्काराची घटना घडल्यामुळे येथील उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना लक्ष्य करुन मारहाण केली जात असल्याचे समोर येत आहे. गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. रविवारीही दोन ठिकाणी हल्ले झाले.

गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे हल्ला होण्याचे आतापर्यंत एकूण ४२ गुन्हे दाखल झाले असून ३४२ जणांना अटक करण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हिंसेच्या भीतीने परराज्यांतून विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारपासून गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनांनी पेट घेतला आहे. त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे गुजरातमधील अनेक उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांनी पळ काढला आहे.