`गुंडांचा नायनाट करा`, बरे झाले अजितदादाच बोलले…थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
517

“पिंपरी चिंचवड शहरातील गुंडांचा नायनाट करा आणि जनतेला दिलासा द्या“, असा सल्ला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पोलिसांना दिला. एका अर्थाने हे लाखत एक काम झाले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे संतांनी म्हटले आहे. अजितदादा बोलतात तेच करतात. पोटात एक आणि ओठात दुसरे, असे सहसा त्यांचे नसते. सगळे रोखठोक असते. काम होणार असेल तर `होय` आणि नसेल तर `नाही` असा सरळसोट व्यवहार असतो. “मी कोणाच्या बापाला घाबरत नाही “,“हा अजितदादाचा `शब्द` आहे“, हे दादांचे नेहमीचे बोल. त्यामुळे गुंडांचा नायनाट करण्याबाबत दादा बोलले, हे बरे झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी आणि गुंडांचा भरणा हे समिकरण होते. सत्तेसाठी वाट्टेल ते हा फॉर्मुला वापरून भाजपाने राष्ट्रवादीतील तमाम गुंडाना सामावून घेतले. गंगाजल शिंपडून त्यांना पवित्र केले. आता पुन्हा बाजी पलटणार असे दिसताच ते सर्व संधीसाधू पुन्हा राष्ट्रवादीत शिरतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गुंडांबाबतचा आताचा पवित्रा पाहिल्यावर किमान राष्ट्रवादीत या गुंडांना पुन्हा संधी मिळणार नाही, असे तूर्तास म्हणायला हरकत नाही. मुळात राजकारणात गुंडांना मिळणारी प्रतिष्ठा बंद झाली तर पुढचे धुणे धुवायची वेळच येणार नाही. गुंडांचा नायनाट करायची कल्पना स्वागतार्ह आहे. किमान आतातरी स्वतः अजितदादा त्यासाठी पुढाकार घेत आहेत. या पध्दतीने सर्व राजकारणाचेच शुध्दीकरण व्हावे. तसे झालेच तर लोक पुन्हा राष्ट्रवादीला डोक्यावर घेतील. शहरातील वाढत्या गुंडागर्दीचे खरे कारण गुंडांना मिळणारा राजाश्रय हेच आहे. दारु गुत्तेवाले, मटका, जुगार अड्डे चालवणारे, जमिनींचे ताबे घेऊन देणारे (लँन्ड माफिया), खंडणीखोर, दहशत निर्माण करणारे, झोपडपट्टीतील दादा-भाई यांच्यामुळे राजकारण सडले. सज्जन मंडळी राजकारण हा गुंडांचा खेळ समजतात आणि तिकडे डोळेझाक करतात. अजितदादांनी अनेकांना वाल्ह्याचे वाल्मिकी केले. किमान आता तरी अशी ब्याद चार हात दूर ठेवा. गुंडागर्दी ही समाजाला लागलेली किड आहे, ती नाहिशी करायची वेळ आहे. भाजपाने भय व भ्रष्ट्राचार मुक्त पिंपरी चिंचवडची घोषणा देत महापालिकेतील सत्ता खेचून घेतली. गेल्या चार वर्षांत घोर निराशा झाली. ते चोर (राष्ट्रवादी) होते, पण हे (भाजपा) तर महादरोडेखोर निघाले, असा आता लोकांचाच सूर आहे. लोकांना समोर योग्य पर्याय दिसत नाही. पुन्हा पुन्हा अशी पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका.

दारुवाले, चोर, खून, खंडणीखोरच नगरसेवक ?
शहररातील गेल्या तीस-चाळीस वर्षांतील राजकीय घडामोडी पाहिल्यावर गुंडागर्दी का वाढली ते समजते. नगरसेवक संजय काळे, अनिल हेगडे, अविनाश टेकावडे यांचे भर दिवसा झालेले खून बरेच सांगून जातात. वाकडला दारु गुत्ता चालवणारी मावशी नगरसेवक होते. चिंचवडगावात मटका, जुगार अड्डा ज्याच्या मालकीचा तो नगरसेवक असतो. तीन-तीन खून केल्याचा आरोप असणारासुध्दा नगरसेवक म्हणून जिंकून येतो. पिंपरीतील मटका किंग नगरसेवक होतो. फ्लॅट खाली करणे, जमिनींचे ताबे मारणे हे धंदे करणारे किमान १०-१५ नगरसेवक आहेत. दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी सारख्या नामचीन गुंडांचे हस्तक इथे समाजसेवेचे दुकान थाटतात. बिल्डरमंडळींना प्रोटेक्शन देणारेही गुंड राजकारणीही इथे आहेत. झोपडपट्टी दादांची संख्या अगणीत आहे. हवाला रॅकेट चालवणाऱ्यांना राजकीय नेत्यांचेच आशिर्वाद असतात. राजकीय पक्ष कोणताही असो, सर्व गुंडांची इथे कायम चलती आहे. वाहनांची तोडफोड कऱणाऱ्या टपोरी मुलांना सोडवा म्हणून राष्ट्रवादीचेच नेते फोन करून दबाव आणतात. हिंजवडीच्या हद्दीत हुक्का पार्लर चालवणारा सुध्दा एक बडा नेताच होता. आळंदी-दिघी-चऱ्होली मधील ज्या हॉटेल लॉज मध्ये वेश्याव्यवसाय चालतो त्याचे मालक हे राजकीय कार्यकर्ते असतात. बेकायदा दगड खाणी चालवणारेसुध्दा नगरसेवक, महापौर होतात. सार्वजनिक आरक्षणांवर अजितक्रमण करणारे गुंडाप्रवृत्तीचे नगरसेवक शहरात आहेत. आयुष्यभर गावठी दारू गाळणारासुध्दा इथे नगरसेवक, महापौर होतो. पंतसंस्था, बँका लुबाडून खाणारे चोर उजळ माथ्याने राजकीय पक्षांचे पदाधिकारी म्हणून मिरवतात. नवीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील दोन नंबरचे धंदे छापे मारून बंद केले तर गुंडांपेक्षा राजकीय नेत्यांचे धाबे दणानले. असे शेकड किस्से सांगता येतील. एका नेत्याने काळे धंदे करणाऱ्यांची बैठक घेऊन, किमान हे पोलिस आयुक्त असेपर्यंत धंदे बंद ठेवण्याचे आवाहन केले, अशी चर्चा आहे. अजितदादा हे कशाचे लक्षण आहे. गुंडांचा नायनाट करायचा तर आधी अशा राजकीय नेत्यांचा बंदोबस्त करावा लागेल. एकट्या पोलिसांचे ते काम नाही. राजकारणाचा पोत सुधारला तर गुंडांचा नायनाट आपो आप होईल. अजितदादा ते करणार असतील तर, डोळे उघडे ठेवून त्यांना साथ द्यायला काहीच हरकत नाही.

…होय, पोलिसांचा वचक गुंडांवर नाहिये –
औंध परिसरात एका रात्री चोरांना घाबरून पोलिस पळाल्याचे उदाहरण उपमुख्यमंत्री अजितदादांनी पोलिसांच्याच कार्यक्रमात सांगतिले. पोलिसांचा वचक गुंडावर हवा नागरिकांवर नको, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येताना भीती वाटता कामा नये, असेही अजितदादा म्हणाले. त्यांच्या या मताशी लोक १०० टक्के सहमत आहेत. पोलिसांचा गुंडावर वचक नाही हे त्रिवार सत्य आहे. वाहतूक पोलिस चौका चौकात कारवाई एवजी मांडवली करतात म्हणून त्यांना कुत्रे घाबरत नाही. शहरातील काळेधंदेवाले वर्षाकाठी सुमारे ५०-६० कोटींचा हप्ता देतात म्हणून तेसुध्दा पोलिसांनी घाबरत नाहीत. पोलिस चौकीत गुंडांची बडदास्त असते आणि नागरिकांना भिकार वागणूक मिळते हा जुनाच अनुभव आहे. पण हे सुधारायचे तर त्याचे दायित्वसुध्दा नेत्यांवर म्हणजेच अजितदादांसारख्या जबादार नेत्यांवर तसेच खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यावरच येते. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गेल्या चार महिन्यांत ज्या पध्दतीने काळेधंदेवाले, गुंड, मवाल्यांना सळो की पळो करून सोडले ते पाहिल्यावर काहीतरी चांगले होते याची खात्री पटते. पालकमंत्री दस्तुरखुद्द अजितदादा पवार यांनीच त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये आणले. त्यामुळेच गुंडांचा नायनाट करा, हा त्यांचा आदेश म्हणा की आवाहन म्हणा प्रामाणिक वाटते. स्वतः कृष्ण प्रकाश यांनी बालगुन्हेगारी समूळ उच्चाटन करण्यासाठी जी मोहिम उघडली त्यात एक सामाजिक भान, तळमळ दिसते. रात्र गस्तीसाठी लोकांचा सहभाग, हा उपक्रमसुध्दा नागरिकांना पोलिसांच्या जवळ नेणारा आहे. यापूर्वी अशा पध्दकीने हे झालेले नाही. पोलिसांची कृती आणि दादांची उक्ती यात कुठेतरी ताळमेळ दिसतो. किमान आगामी महापालिका निवडणुकिच्या आत शहरातील गुंडागर्दी संपुष्ठात येईल आणि खऱ्या अर्थाने शहर भयमुक्त होईल, अशी अपेक्षा करू या.