“…असले आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही”

0
232

मुंबई,दि.११(पीसीबी) – “ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसंच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केलं. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत. अब्रुनुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे,” असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“राजकारण, समाजकारणात, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं. तुमच्यासारखे फडतूस लोक आमच्यावरती आरोप करत बसावेत आणि त्याबद्दल वाईट प्रसिद्धी मिळावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही,” असंही संजय राऊत यांनी सुनावलं.

दरम्यान “ही कायद्याच्या पलीकडची भाषा असेल, पण मला आणि पक्षाला प्रतिष्ठा महत्वाची आहे. जे कायद्याच्या पलीकडे जाऊन भाष्य करत आहेत त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? पक्षाने आमचा या व्यक्तीशी कोणताही संबंध नाही असं सांगावं. ही माकडं उड्या मारत आहेत त्यांच्याशी संबंध नाही असं त्यांनी सांगावं,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.