गिरीश बापट मंगळवारी पालकमंत्रिपदाचा राजीनामा देणार; नवे पालकमंत्री कोण?  

0
639

पुणे, दि. ३ (पीसीबी) – पुण्याचे  पालकमंत्री गिरीश बापट पुणे लोकसभा मतदारसंघातून  खासदार म्हणून  निवडून आले आहेत.  त्यामुळे  बापट  पालकमंत्री पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.४)  देणार आहेत. पालखी सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर  बापट यांनी आज (सोमवार) राजीनामा देण्याची घोषणा केली. 

गेल्या २५ वर्षापासून गिरीश बापट  कसबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. २०१४ मध्ये  भाजप सरकारमध्ये त्याच्याकडे पुणे पालकमंत्री तसेच अन्न, औषध, प्रशासन आणि संसदीय कार्य या मंत्रिपदांची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर बापट यांना राज्यातील मंत्रिपदासह पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार हे निश्चित होते.

दरम्यान,  बापट यांनी स्वतः आपण  पालकमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. आता पालकमंत्री कोण होणार याची चर्चा   सुरु झाली  आहे.  जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, आमदार  माधुरी मिसाळ यांची नावे पालकमंत्री पदासाठी चर्चेत आहेत.  मात्र,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  कोणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.