गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने पिंपरीत एकाच्या डोक्यात घातला कोयता

0
799

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – रस्त्याच्या मधोमध पार्क केलेली गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने चौघांनी एका तरूणाला मारहाण करून त्याच्या डोक्यात कोयता घातला. ही घटना गुरूवारी (दि.७) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपरीरोडवरील बौध्दनगर येथे घडली.

या प्रकरणी अभिजित गायकवाड, अक्षय वाघमारे, स्वप्नील गाडे, जीवन गालभाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कुणाल भाऊसाहेब रोकडे (वय १९,रा. बौध्दनगर,पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी कुणाल आणि त्याचा मित्र विठ्ठल बौध्दनगर येथून जात होते. त्यावेळी आरोपी अभिजित हा रस्त्याच्या मधोमध गाडी लावून फोनवर बोलत होता. कुणाल यांने अभिजितला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने अभिजितने आपल्या मित्रांना बोलावून घेऊन कुणाल आणि त्याच्या मित्राला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर आरोपी  अक्षय वाघमारे याने कुणालच्या डोक्यात कोयता घातला.

या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.