लक्षणे दिसताच तात्काळ टेस्टींग करावे – डॉ. प्रशांत खाडे

0
269

पिंपरी दि.१३ (पीसीबी) – ताप येणे, सर्दी, अंगदुखी इत्यादी कोरोना सदृश लक्षणे दिसत असल्यास हा आजार अंगावर काढणे अत्यंत धोकादायक आहे. लक्षणे दिसताच तात्काळ टेस्टींग करावे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या, आवश्यक कारणांसाठी घराबाहेर पडाव्या लागणाऱ्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तीने जास्त काळजी घ्यावी, असा सल्ला डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँण्ड रिसर्च सेंटरचे उपप्राचार्य आयुर्वेदाचार्य डॉ. प्रशांत खाडे यांनी दिला. वेळीच केलेल्या टेस्टींगमुळे औषधोपचार सुरु करता येतात. नागरिकांनी आपली ऑक्सिजन पातळी वेळोवेळी तपासत राहावी, असेही ते म्हणाले.

कोरोना आजाराची वर्तमान परिस्थिती आणि आयुर्वेद या विषयावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर डॉ. प्रशांत खाडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले. ६ मिनिटे वॉक टेस्ट काय आहे या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. खाडे म्हणाले, बऱ्याचदा इन्फेक्शन होऊनही ऑक्सिजन पातळी व्यवस्थित राहते. परंतु त्याचवेळी फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी नागरिकांनी सलग ६ मिनिटे चालावे. ऑक्सिमीटरच्या सहाय्याने ऑक्सिजन पातळीचे चालण्यापूर्वी आणि नंतरच्या नोंदी घ्याव्यात. या दोन्ही आकड्यांमध्ये तीन पेक्षा जास्त अंतर असू नये. तसे असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. ऑक्सिजन लेव्हल ९०, ८९ असलेल्या रुग्णांनी फुफ्फुसाची क्षमता कमी झाल्यामुळे ६ मिनिटे वॉक टेस्ट करू नये. ऑक्सिजन पातळी ९२ पेक्षा कमी असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे ते म्हणाले.

लवकरात लवकर म्हणजे कधी संपर्क साधावा या प्रश्नावर बोलताना डॉ. खाडे म्हणाले, लक्षणे दिसू लागल्यास तात्काळ तपासणी करावी. सीटी स्कोर आणि सीआरपी व्हॅल्यू, आवश्यक असल्यास एचआरसिटी रिपोर्ट, ऑक्सिजन लेव्हल या माहितीच्या आधारे लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. सुरुवातीचे दिवस दुर्लक्ष केल्यास आजार बळावू शकतो, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवावी याबद्दल माहिती देताना डॉ. खाडे म्हणाले, आपण आजारीच पडू नये याची काळजी घेतली पाहिजे. मास्कचा वापर करणे, हातांची स्वच्छता राखणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. वाफ घेणे, हळद घातलेले दुध पिणे, आयुष काढा घेणे असे उपाय करणे फायदेशीर ठरते. तसेच गुडूची, अश्वगंधा इत्यादी औषधांचे वैद्यांच्या सल्ल्याने सेवन करावे. कोविडनंतर शरीर तंदुरुस्त व्हावे यासाठी आयुर्वेदिक उपचार घ्यावेत.

लहान मुलांचा कोरोनापासून बचाव व्हावा यावर उपाय सांगताना डॉक्टर प्रशांत खाडे म्हणाले, लहान मुलांना अनावश्यक फास्ट फूड, बेकरी पदार्थ खायला देणे बंद करावे. घरातले ताजे अन्न, पोळी भाजी, दूध इत्यादी खाद्यपदार्थ द्यावेत. उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. तसेच सुवर्णप्राशन संस्कार यांसारखे आयुर्वेदिक उपाय करावेत. च्यवनप्राशचे सेवन करावे. वैद्यकीय सल्ल्याने काढे घ्यावेत, आईस्क्रीम खाऊ नये. जेवण सकाळी १० ते ११ आणि संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान घ्यावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.