खासदार सुप्रिया सुळेंच्याविरोधात पुन्हा एकदा महादेव जानकर रिंगणात

0
1968

पुणे, दि. १६ (पीसीबी) – बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याची तयारी  राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्याचे आदेश रासपच्या प्रदेश सरचिटणीस डॉ.अर्चना पाटील यांनी दिले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या  तोंडावर महादेव जानकर यांनी तयारीला  सुरूवात केली आहे. त्याच भाग म्हणून इंदापूर तालुक्यातील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुथ यंत्रणा मजबूत करण्यावर भर द्यावा. त्यासोबतच ‘एक बुथ,दहा युथ’ ही संकल्पना राबवून  कार्यकर्त्यांनी मतदारांशी जनसंपर्क वाढवावा, अशा सुचना डॉ.अर्चना पाटील यांनी दिल्या  आहेत.

दरम्यान, लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात ४.५ लाखापेक्षा जास्त मते घेऊन पवारांना घाम फोडला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून महादेव जानकर हे बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारामती मतदारसंघात सुळे आणि जानकर यांच्यात सामना रंगण्याची चिन्हे आहेत.