खासदार संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांकडून रामदास कदमांना धमकीचे फोन ?

0
761

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धमकीचे फोन आले आहेत. खासदार  छत्रपती संभाजी राजे यांच्या कार्यकर्त्यांकडून हे फोन आले आहेत, असा दावा रामदास कदम यांच्याकडून करण्यात आला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार संभाजी राजे यांच्यावर रामदास कदम यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर  कदम यांना संभाजीराजे यांच्याकडून धमकीचे फोन आले असावेत, असे बोलले जात आहे.  

काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये एका कार्यक्रमात  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार  संभाजी राजे यांनी नारायण राणे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. मराठा आरक्षणाचे खरे श्रेय राणेंचे आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते. यावरून रामदास कदम यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्यावर टीका केली होती.  छत्रपती संभाजी राजेंबद्दल आम्हाला सन्मान आहे. मात्र, त्यांनी कोणाची लाचारी पत्करू नये, असे कदम यांनी म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर  रामदास कदम यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना धमकावले जात आहे,  असे सांगितले जात आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात  आलेला नाही.