खासदार उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; तर्कवितर्कांना उधाण

0
871

सातारा, दि. ९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा उदयनराजेंना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. त्यातच उदयनराजे मुख्यमंत्र्यांची  भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे  या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे उदयनराजेंनी म्हटले आहे. मात्र, अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.   

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत ६ आणि ७ ऑक्टोंबरला राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोर साताऱ्यातील आमदार आणि नेत्यांनी उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे सांगितले. यानंतर उदयनराजे आणि पवार  यांच्यामध्ये चर्चा झाली.

मात्र,  उदयनराजेंना शरद पवारांनी कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळेच इतर पक्षातही आपले मित्र असल्याचे सूचक विधान उदयनराजेंनी केले होते. या पार्श्वभूमीवर उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.. त्यामुळे या भेटीत काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.