कोल्हापुरात शिवसेनेचे खासदार काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात

0
522

कोल्हापूर, दि. १८ (पीसीबी) – कोल्हापुरातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांचा जाहीर प्रचार करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. लोकसभेला युती धर्म म्हणून भाजपचे आमदार अमल महाडिक कधीही प्रचारात आले नाहीत. आता आम्हाला संधी आली आहे, बंटी पाटलांच्या उपकारांची परतफेड करण्याची, असे मंडलिक या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे ऋतुराज पाटील आणि भाजपचे अमल महाडिक यांच्यात काट्याची लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात प्रचार केला होता.  त्यामुळे  काँग्रेसला मदत करण्याची भूमिका शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी घेतली आहे.

संजय मंडलिक यांनी व्यासपीठावर जाऊन ऋतुराज यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले होते.  आता  मंडलिक घरोघरी जाऊन ऋतुराज यांचा प्रचार करत आहेत.  तसेच  लोकसभेवेळी अमल महाडिक यांनी युती धर्म पाळला नाही. त्यामुळे आता विधानसभेला त्याची परतफेड करण्याची संधी मिळाल्याचे मंडलिक म्हणत असल्याचे दिसत आहेत.