कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत रेल्वे मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता महाराष्ट्रामध्ये…

0
336

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याला ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज पहाटे विशाखापट्टणम येथे दाखल झाली आहे. यातील टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी 20 तासांचा अवधी लागणार आहे.

पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस पहाटे दाखल –
राज्यातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस 7 रिकामे टँकर घेऊन 19 एप्रिलला रवाना झाली. त्यानंतर आज पहाटे 4 वाजता ती विशाखापट्टणम येथे दाखल झाली आहे. यात ऑक्सिजन भरण्यासाठी तब्बल 20 तासांचा कालावधी लागणार आहे. आंध्रप्रदेशातील विशाखा स्टील प्लांटमधून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. या प्लांटमधील अधिकाऱ्यांनी या टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यानुसार, सुरुवातीला रेल्वे गाड्यातून हे सात टँकर खाली उतरवले जाते. त्यानंतर त्यात ऑक्सिजन भरला जाईल. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियाला किमान 20 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ऑक्सिजन भरल्यानंतर रेल्वेतील इंजिनिअरच्या मदतीने हे टँकर व्यवस्थितरित्या रेल्वेवर चढवले जातील. त्यानंतर रात्रीपर्यंत ती एक्सप्रेस पुन्हा परत महाराष्ट्रात येण्यासाठी रवाना होईल, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, शिवेसनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकरच्या कपट नितीमुळे महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेल्या एक्सप्रेसला उशिर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन उपलब्ध होणार
या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असं केंद्र शासनाला सुचवलं होतं. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली. यापुढील काळात ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.