कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी आता राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिप, बजरंगदलाचे मोठे अभियान

0
270

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या कोरोना प्रकोपाला पायबंद घालण्यासाठी राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्व हिंदुत्ववादी संघटना यांच्यामार्फत शहरात कोरोना प्रतिबंधक उपाय योजना अभियान राबवले जाणार आहे.

या अभियानाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन चिंचवडगाव येथील भारतमाता भवन येथे आज (गुरुवार) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ज्यांना या अभियानात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी पुढे दिलेल्या लिंक वर (https://forms.gle/DC4u4xQ6Acou9VLTA) आपली नोंदणी करावी. कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व निर्बंध पाळून होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रा.स्व.संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक डॉ.गिरीशजी आफळे यांनी केले आहे.

अभियानात ज्या पध्दतीने काम करायचे आहे त्यात प्रामुख्याने शहरातील व्यापारी व किरकोळ विक्रेते यांचे मास स्क्रिनिंग करणे, नागरिकांना रोगप्रतिकार शक्तीवर्धक आयुर्वेदिक काढ्याचे वाटप करणे, शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या विषयी काळजी , प्रबोधन व समुपदेशन करणे, आरोग्य समिती मार्फत शहरात कोरोना प्रकोपाला रोखण्यासाठी प्रबोधन करणे, कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या अंत्यविधी पार पाडणे, महानगरपालिकेला डाटा एंट्री साठी सहकार्य करणे, शहरात कोविड केअर सेंटर उभे करून रुग्णांची काळजी घेणे सुश्रुषा करणे आदी प्रकारच्या कामांचा समावेश आहे, असे डॉ. आफळे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.