बिर्ला रुग्णालयाकडून मानसिक त्रास, आरोग्य सेविकांची गंभीर तक्रार

0
350

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – थेरगाव (चिंचवड) येथील आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप रुग्णालयातील आरोग्यसेविका, सेवकांनी केला आहे. बाऊंसरच्या माध्यमातून धमकाविण्याचा प्रयत्न केला जातो, असेही त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या या कार्यपध्दतीच्या विरोधात आज (दि.6) सकाळी रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन सुरु केले आहे. भर पावसात हे आंदोलन सुरु आहे.

आरोग्यसेविका, सेवकांवर अन्याय केला जाते आहे. जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जाते. ते देखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे स्टाफनर्स काम करण्यासाठी इच्छुक नाहीत.

आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कोरोनात जे काम करत आहोत त्यामुळे या महिन्यात वेतनात वाढ देण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. पण, वेतन वाढले नाही. रुग्णांच्या तुलनेत कर्मचारी अत्यंत कमी आहे. नर्स नसताना त्यांचे कपडे हाऊसकिपिंग कर्मचा-यांना दिले जातात आणि नर्स म्हणून ते रुग्णालयात फिरतात, असा आरोप त्यांनी केला. यामुळे रुग्ण, रुग्णाच्या नातेवाईकाला ते नर्स असल्याचेच वाटत होते. आम्हाला दिले जाणारे कपडे व्यवस्थित नाहीत. रोटेशन व्यवस्थित नाही. वाढीव वेतन दिले नाही, अशा अनेक समस्या असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रुग्णसेविका, रुग्णसेवकावर प्रचंड अन्याय होत आहे. कोविड रुग्णालयात सहा तासच ड्युटी करण्याचा निर्णय आहे. पण, आम्हाला सात-सात, 12-12 तास ड्युटी करावी लागत आहे. यामुळे ताण येत आहे. राजीनामा दिला तरी चालेल असे सांगतात. स्टाफ, बाऊंसरच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही आरोप केला. या कर्मचाऱ्यांनी दिवसभर आंदोलन करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
दरम्यान,

दरम्यान, या कर्मचाऱ्यांना नेमून दिलेले काम ते करत नाहीत, त्यांना कामाची सक्ती करू शकत नाही आम्ही दुसरा पर्याय शोधत आहोत, असे रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांनी सांगितले.