सास-याकडून जावयाला बेदम मारहाण

0
340

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पत्नीला घेण्यासाठी तिच्या माहेरी आल्यानंतर झालेल्या किरकोळ वादावरून सासरा जावयाच्या घरी आला. सास-याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून जावयाला आणि त्याच्या घरच्यांना बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार बुधवारी (दि. 5) सकाळी आठ वाजता परंदवडी येथे घडला.

विजय सुशीराज छेत्रे (वय 30, रा. परंदवडी, ता. मावळ) असे जखमी जावयाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, सासरा लक्ष्मण दांडेकर आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला माहेरहून आणण्यासाठी तुर्भे येथे गेले होते. त्यावेळी विजय यांच्या सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणांवरून त्यांच्यासोबत भांडण केले. त्यानंतर विजय आपल्या घरी आले. बुधवारी सकाळी आरोपी सासरे आणि त्यांचे दोन अनोळखी साथीदार फिर्यादी यांच्या घरी आले.

जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी विजय, त्यांची आई, वडील आणि भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सासरे लक्ष्मण यांनी विजया यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी विजय यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि निघून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.