कोरोनाच्या ११६ दिवसांत १०,००० मृत्यू

0
238

मुंबई, दि. १२ (पीसीबी) राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि सोलापुर या शहरांमध्ये कोरानोचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. गेल्या २४ तासांत राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८१३९ करोनारुग्ण नोंदले गेले. लॉकडाउनसारखे कठोर उपाय योजूनही राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात दिवसभरात २२३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत १० हजार ११६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ११६ दिवसांत राज्यात दहा हजार कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. यातील पाच हजारांपेक्षा जास्त मृत्यू एकट्या मुंबईतील आहेत.

१७ मार्च रोजी राज्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. १६ जून रोजी राज्याने पाच हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर अवघ्या २५ दिवसांत राज्यात पाच हजार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी राज्यात सात हजार ८६२ रुग्णांची नोंद झाली होती. ही आतापर्यंतची राज्यातील सर्वात मोठी वाढ होती. पण दुसऱ्याच दिवशी हा विक्रम मोडला होला. शुक्रवारी राज्यात ८ हजार १३९ नवीन रुग्ण आढळले. जुलै महिन्यातील पहिल्या ११ दिवसांत राज्यात तब्बल ७१ हजार ८३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाख ४६ हजार ६०० इतकी झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत एक हजार २८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९१ हजार ७४६ इतकी झाली आहे. मुंबईत ४८ तासांत ३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५२४१ जणांचा कोरोनी बळी घेतला आहे. आतापर्यंत ६९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शनिवारी मुंबईत आणखी १३०८ रुग्णांची नोंद झाली. तर १४९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ९३१ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. ४८ तासांत ३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून गेल्या काही दिवसातील एका दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे.

मुंबईतील रुग्णवाढ आता आटोक्यात येऊ लागली असून मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी ५० दिवसांवर गेला आहे. २२ मार्च रोजी मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३ दिवस होता. त्यानंतर पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता ही रुग्णवाढ आटोक्यात आली असून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला आहे. तर सरासरी रुग्णवाढ १.३९ टक्कय़ांवर आली आहे.