वसईतील प्रसिध्द डॉ. हेमंत पाटील यांचे कोरोनामुळे निधन

0
335

वसई, दि. १२ (पीसीबी) : वसईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि माजी नगरसेवक हेमंत पाटील यांचे कोरोनान निधन झाले. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच डॉ. हेमंत पाटील हे कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत होते. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे ते कट्टर समर्थक होते.

नालासोपाऱ्यातील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 दिवसापासून ते अत्यवस्थ होते, अशी माहिती महापौर प्रवीण शेट्टी यांनी दिली आहे.

डॉ. हेमंत पाटील हे वसईतील प्रसिद्ध डॉक्टर होते. मागच्या 10 वर्षांपासून वसई विरार महापालिकेची आणि त्यापूर्वी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची सर्वस्वी जबाबदारी ते स्वतःहून सांभाळत होते. हेमंत पाटील यांनी नगरसेवक आणि सभापतीपदही सांभाळलेले आहे.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे ते कट्टर समर्थक होते. खुद्द हितेंद्र ठाकूर यांनी हेमंत पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्याला यश आले नाही.