“कॉंग्रेस नेते मेले होते. उद्धव ठाकरेंनी यांना सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत झाले, नाहीतर….”

0
465

नागपूर, दि.२८ (पीसीबी) : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. मात्र, तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये अद्यापही धुसफूस असल्याची प्रकरणं समोर येत आहेत. शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं होतं. आता नागपूरमधील शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांची काँग्रेस नेत्यांवर टीका करताना जीभ घसरलीय. आशिष जैस्वाल यांनी कॉंग्रेस नेत्यांवर प्रहार केलाय. ‘कॉंग्रेस नेते मेले होते, उद्धव ठाकरे यांनी यांना सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत झाले, नाहीतर हे मेले होते, एका एका व्यक्तीला पुरून उरणार आहे मी’ असं वक्तव्य जैस्वाल यांनी केलंय. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे.

काँग्रेस नेते मेले होते उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतल्यानंतर ते जिवंत झाले होते. यांच्या दोन्ही पार्टीमध्ये गळती लागली होती. तुम्ही लोकं मेलेला होता, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं, सर्वजण सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात यायला तयार होते. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं त्यामुळं मेलेले लोकं जिवंत झाले आहेत. शिवसेनेच्या मतदारसंघात तुम्ही इतरांना मतदान करायला सांगता, एका एकाला मी पुरुन उरणार आहे, असा इशारा आशिष जैस्वाल यांनी काँग्रेस नेत्यांना दिला आहे.

शिवेसना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या वादांवर काय भूमिका घेणार हे येत्या काळात समोर येईल.

शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी थेट राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी कांदेंनी थेट न्यायालयातच धाव घेतली. याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देखील प्रतिवादी करण्यात आलं आहे. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात ऐन बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यानंतर भुजबळांविरोधात कांदेंनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यामुळे नाशकात महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे