केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील पहिल्या अकादमीला अखेर मंजुरी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची माहिती

0
381

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) :- ‘उद्योगनगरी’ असलेल्या पिंपरी चिंचवडची नवीन ओळख ‘कलानगरी’ अशी होणार आहे. केंद्र सरकारने आता पिंपरी चिंचवडमध्ये ललित कला अकादमी उभारणीच्या प्रास्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिली.
विशेष म्हणजे, भोसरी विधासभा मतदार संघातील सुमारे १५ एकर जागेवर ही अकादमी उभारण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यांमध्ये ललित कला अकादमी केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्र हा कलेची पंढरी असतानाही राज्यात अद्याप असे केंद्र उभारले नव्हते. परिणामी, अप्रत्यक्षपणे कलावंतांची उपेक्षा झाली होती. अशाप्रकारची कला अकादमी महाराष्ट्रात उभारली जावे. याकरिता राज्यातील शिल्पकार मूर्तिकार चित्रकार आदींनी दिल्ली येथे ४० वर्षे मागणी करीत होते. 

दरम्यान, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्याकडे केंद्र सरकारच्या पुढाकाराने ललित कला अकादमी पिंपरी चिंचवड परिसरात उभारण्यात यावी. याकरिता ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचर्णे, भाजपा आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी एकत्रितपणे पाठपुरावा सुरू केला होता.
अकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचर्णे म्हणाले की, गेले ४० वर्षे महाराष्ट्रात ललित कला अकादमी केंद्र सुरू करण्याबाबत मागणी केली. मात्र, राजकीय अनास्थेमुळे केंद्र उभारणीत अडथळे निर्माण झाले होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकामी लक्ष घालून सांस्कृतिक मंत्रालयाला मार्गदर्शक सूचना दिल्या. चेन्नईपासूनपासून दिल्लीपर्यंत पश्चिम भागात एकही केंद्र नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कलाकरांवर अन्याय होत होता. देशात प्रथम चार केंद्र होणार होती. त्यापैकी एक मुंबईला होणार होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे संस्कार भारतीचे अध्यक्ष वासुदेव कामत आणि अनेक लोकांनी सात्यत्यपूर्ण पाठपुरावा करीत आम्ही अखेर महाराष्ट्राला केंद्र मिळवू शकलो. पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार यामधील हा फरक आहे. महाराष्ट्रात जागा उपलब्ध व्हावी, अशी केंद्र सरकारची मागणी होती. तशी तयारी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने दर्शवली. त्यामुळे केंद्र उभारणीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.
जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाचा अभ्यास होईल..

जगात कलेचे तंत्र बदलले आहे. भारतीय कलाकार जे तंत्र वापरतो. विदेशात कलाकार गेले तर त्यांना नवीन तंत्र अवगत होईल. नाविन्यपूर्ण कलाकृती बनविण्यात आपण कमी पडत आहोत. रसिक समाजाचे मापदंड काय आहेत? जीवनाचा अर्थ काय आहे? गॅलरीतील आनंद, म्युझियम, समाजाचा कल्पनांपलिकडे जावून रसिकता निर्माण करण्यासाठी कलेची निर्मिती करणारी सेंटर तयार झाली पाहिजेत, असे उत्तमराव पाचर्णे यांनी म्हटले आहे.

कलाकारांना व्यासपीठ निर्माण होईल – आमदार लांडगे
औद्योगिकनगरी, कामगार नगरी, ॲटो हब, आयटी सिटी, स्पोर्टस सिटी, एज्युकेशन हब आणि आता आपल्या शहराची ओळख कलानगरी व्हावी. यासाठी भोसरी व्हीजन- २०२० च्या माध्यमातून आम्ही ललित कला अकादमीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या सहकार्यातून सर्वांनी आपआपल्या परीने प्रयत्न केले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ललित कला अकादमी उभारल्याने शहराच्या लौकिकात भरच पडणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात पिंपरी चिंचवडला ही अकादमी साकारली जात आहे. त्यामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण होईल. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.