“…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट”

0
233

सांगली, दि.२४ (पीसीबी) – राज्य सरकार हे काही गोष्टी स्वतःवर ओढवून घेत आहे, राज्य सरकार हे केंद्राचे निर्णय आणि आदेश मान्य करत नसेल तर ती बंडखोरी आहे, ते घटनाबाह्य आहे, त्यामुळे केंद्र सरकार कदाचित महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावू शकते, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला सल्लावजा इशारा दिला आहे. सांगलीमध्ये आंबेडकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे, त्यांची वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी झाली नाही, आम्ही तर फक्त हरलेल्या जागा मागितल्या होत्या, तरी त्यांनी त्या दिल्या नव्हत्या. शिवाय काँग्रेस हा पक्ष संपला आहे, आम्ही काँग्रेसला दोन वेळा वाचवायचा प्रयत्न केला, तरी पण काही उपयोग झाला नाही. ऐन निवडणुकीत हॉलिडे मूडमध्ये असणाऱ्या नेत्यांच्या पार्टीचं कल्याणच होणार, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेतृत्वावर केली.

यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. 2019 च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ‘वंचित’ने त्यांच्याशी युती केली नाही. आम्ही केवळ हरलेल्या जागा मागितल्या होत्या, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.