कृषी विधेयक महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही – बाळासाहेब थोरात

0
162

मुंबई,दि.२८(पीसीबी) – कृषी विधेयक महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही, असं काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये कृषी विधेयक मंजूर झाल्यानंतर (27 सप्टेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे.

“कृषी विधेयकाला आम्ही विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलनदेखील करत आहोत. या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील विरोध केला आहे. शिवसेनेचं मतदेखील तेच आहे. पण आम्हाला हा विधेयक लागू करण्याबाबत स्ट्रॅटेजी ठरवायची आहे. त्यासाठी आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तो कायदा लागू होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान “केंद्राचा नवा कायदा कृषी उत्पन्न बाजार समितीला संपवणारा आहे. नव्या कायद्यात व्यापाऱ्याला मुक्तपणे परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळेल याची हमी या कायद्यात देण्यात आलेली नाही, ती हमी कृषी उत्पन्न बाजार समितींची होती”, असं थोरात यांनी सांगितलं.