काही लोक वाद व्हावेत यासाठी वाट बघत आहेत – बाळासाहेब थोरात

0
564

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – शिवसेनेचे नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीनं नगरसेवक फोडल्यानं शिवसेना नाराज असल्याचंही वृत्त समोर आलं होत. मात्र, यावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचं वृत्त राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फेटाळून लावलं आहे.

पारनेर नगरपंचायतीची मुदत संपत असून तीन महिन्यानंतर निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी नगरपंचायतीच्या डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधारे, वैशाली औटी, नंदा देशमाने या पाच नगरसेवकांसह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख उमा बोरुडे, उद्योजक सहदेव तड्ढहाळ, शैलेश औटी आदींनी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

त्यानंतर शिवसेनेनं यावर नाराजी व्यक्त केली होती. यावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. “महाविकास आघाडीत कोणताही वाद सुरू असण्याचा प्रश्नच नाही. आमच्यामध्ये वाद व्हावेत म्हणून काही लोक वाट बघत आहेत. ते अशा प्रकारचा प्रचार करण्याचं काम करत आहे. पण, हा प्रसार सोडला तर कसलाही वाद नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे आणि आम्ही सर्व एकत्र आहोत,” असं थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शिक्षण मंत्र्यांसाठी वाहन खरेदीच्या प्रकरणावरही थोरात यांनी भाष्य केलं. “वाहन खरेदीची वृत्त पूर्ण माहितीच्या आधारावर देण्यात आलेलं नाही. सहा वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. पण, एक वाहन खरेदीचाच प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे,” असं थोरात म्हणाले.