काळेवाडीत दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाच्या डोक्यात घातला दगड

1349

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.११) सायंकाळी पाचच्या सुमारास काळेवाडी फाटा येथील स्टेट बँकेसमोर घडली.

अनिल भिमराव नाईकवाडे (वय ४९, रा. जयमल्हार कॉलणी थेरगाव) असे दगड लागून जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, सोमनाथ घोगरे (रा. गुरुनानकनगर, साने गुरुजी शाळे मागे, थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काळेवाडी फाटा येथील स्टेट बँकेसमोरुन अनिल नाईकवाडे पायी चालले होते. यावेळी आरोपी सोमनाथ त्यांच्याजवळ आला आणि दारु पिण्यासाठी पैसे मागितले मात्र नाईकवाडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या घोगरे याने रस्त्यावरील दगड नाईकवाडे यांना फेकून मारला. तो दगड नाईकवाडे यांच्या कानावर लागला आणि ते गंभीर जखमी झाले. आरोपी घोगरे याला अटक करण्यात आलेली नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत.