काय सांगता…आता लवकरच कोरोना चाचणी घरीच

0
226

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीब) : कोविड १९ चाचण्यांसाठी घरगुती वापराचे चाचणी संच लवकरच प्रत्यक्षात येणार असून दिल्लीची भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या दोन संस्था पर्यायी चाचणी पद्धत शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. लोक घरीच ही चाचणी करू शकतील व लगेच त्याचा निकालही त्यांना मिळेल. औद्योगिक व वैज्ञानिक संशोधन परिषद म्हणजे सीएसआयआरच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्याला मायक्रोसॉफ्ट इंडिया या संस्थेने आर्थिक मदत दिली आहे. एक महिन्यात हा संच तयार होणार आहे. या प्रयोगात सहभागी वैज्ञानिकांनी कोविड विरोधात एलायझा (एन्झाइम लिंकड इम्युनोअ‍ॅसे) यावर आधारित चाचणी विकसित केली आहे. जर ती यशस्वी झाली तर त्यातून एलायझामध्ये वापरले जाणारे अँटीजेन तयार करण्याची प्रक्रिया सोपी व किफायतशीर होणार आहे त्यातून चाचणी सोपी व स्वस्त होणार आहे. कोविड १९ विषाणूची स्वस्त व सोपी चाचणी विकसित करणे महत्त्वाचे आहे. सध्या रिअल टाइम पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन  ही चाचणी जास्त विश्वासार्ह मानली जाते. पण ही चाचणी प्रयोगशाळेतच केली जाऊ शकते. त्यासाठी अनेक तास व दिवस लागतात. त्यामुळे नवीन पद्धत शोधणे गरजेचे होते असे रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्रा. अनुराग राठोड यांनी सांगितले. करोना विषाणूमध्ये अनेक प्रकारचे प्रोटिन असतात त्यात स्पाइक एस, एनव्हलॉप -इ, मेम्ब्रेन -एम व न्युक्लिओकॅपसिड-एन यांचा समावेश असतो. यात मायक्रोप्लेट आधारित एन्झाइम इम्युनोअसे तंत्राचा वापर चाचणीसाठी केला आहे. या चाचणी संचाची किंमत अजून निश्चित करण्यात आलेली नाही. आंध्र प्रदेशातील मेडटेक झोन या विशाखापट्टनममधील परिसरात या चाचणी संचांचे उत्पादन होणार आहे.