काँग्रेस-राष्ट्रवादीची खेळी; साताऱ्यातून उद्यनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण

0
647

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी  आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला आहे.  त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आगामी विधानसभा निवडणुकीबरोबर  होण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी साताऱ्यात उदयनराजेंविरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून तसे आदेशही देण्यात आल्याचे  सांगितले जाते.  चव्हाण यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीही अनुकूल असल्याचे समजते. साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा  सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.  त्यावेळी उद्यनराजेंनी भाजप प्रवेश केल्यास संभाव्य राजकीय परिस्थितीवर   चर्चा झाल्याची शक्यता आहे.

दरम्यान, चव्हाण यांचा साताऱ्यातून लढण्याबाबत होकार आल्यास सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवत उद्यनराजे यांचे मताधिक्य कमी केले होते.    त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी  लोकसभा पोट निवडणुकीत दगाफटका झाल्यास आपल्याला राज्यसभेवर पाठवण्यात यावे,  अशी अटी भाजपसमोर ठेवली आहे.