काँग्रेस आमदार आनंदराव पाटलांचे पुत्र; पुतण्यासह कार्यकर्ते भाजपमध्ये

0
411

कराड, दि. २४ (पीसीबी) –  काँग्रेसचे विधान परिषद सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर आनंदरावांचा भाजप प्रवेश चर्चेत असतानाच पुत्र प्रताप व मानसिंग तसेच पुतण्या सुनील पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने काँग्रेसचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जोरदार धक्का बसला आहे.

आनंदराव पाटील हे विधान परिषद सदस्य असून, त्यांचा या आमदारकीचा कार्यकाल अजून बाकी असल्याने त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना भाजपात दाखल करून आपली खुर्ची कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. आमदार आनंदराव पाटील हे गेली चार दशके काँग्रेसच्या जिल्ह्याच्या राजकारणाची चव्हाण गटाची धुरा संभाळून आहेत. पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या मातोश्री काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा, खासदार (कै.) प्रेमलाकाकी चव्हाण यांचे स्थानिक राजकारण आनंदरावच सांभाळत असत. आनंदरावांखेरीज चव्हाण गटाच्या राजकारणाचे पानही हलत नसे. अशी नामी हुकमत राखून असलेले आनंदराव पाटील अलीकडे थेट पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच नाराजी व्यक्त करून टीकाही करीत होते. गेल्या १५ दिवसांपूर्वी आनंदरावांची मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अन्य नेत्यांची भेट कराड दक्षिणचे भाजपचे उमेदवार व पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरे न्यासाचे अध्यक्ष डॉ. अतलु भोसले यांनी घडवून आणली होती. यानंतर लगेचच त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन काँग्रेसमधून आपल्याला मिळणारी मानहानीकारक वागणूक व होणारा अन्याय कार्यकर्त्यांसमोर मांडला होता. या पाश्र्वभूमीवर आनंदराव आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये दाखल होतील अशी चर्चा होती. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.

मुंबई येथे आज आनंदराव पाटील यांचे पुत्र विद्यार्थी काँग्रेसचे नेते प्रताप, मानसिंग तसेच पुतणे कराड बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर. टी. स्वामी, संतकृपा शिक्षण संकुलाचे संस्थापक अशोकराव भावके, विजयनगरचे सरपंच वसंतराव शिंदे, उपसरपंच विश्वास पाटील, विंगचे माजी सरपंच वसंतराव शिंदे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हापरिषद सदस्य सविनय कांबळे, उंडाळे गावच्या उपसरपंच अनुसया शेवाळे यांच्यासह मोठय़ा संख्येने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. त्यांचे या वेळी चंद्रकांत पाटील यांनी पक्षात स्वागत केले. भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, किरीट सोमय्या आदींची उपस्थिती होती.