कसब्याच्या पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपला भोवली

0
142

पुणे, दि. ११ (पीसीबी) : कसब्याच्या पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाची नाराजी भाजपला भोवली. भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांचा दारूण पराभव झाला. याचाच राग काढण्यासाठी भाजपने अर्थसंकल्पात ब्राह्मण समाजावर अन्याय केला, असा आरोप हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केलाय. पुण्यात टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी त्यांनी या भावना बोलून दाखवल्या. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प काल विधानसभेत सादर केला. सर्व जाती-जमातीतील नागरिकांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र ब्राह्मण समाजाच्या मागण्या अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आल्या नाहीत, असा आरोप हिंदु महासभेचे आनंद दवे यांनी केलाय.

आनंद दवे यांचे आरोप काय?
पुण्यात टीव्ही ९ शी बोलताना आनंद दवे म्हणाले, ‘ राज्य सरकारने कसबाचा राग ब्राह्मण समाजावर काढला आहे. धनगर समाजाला 35,000 कोटी, भिडे स्मारकाला 50 कोटी, लिंगायत समाजासाठी बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ : 50 कोटी, गुरव समाजासाठी काशीबा गुरव विकास महामंडळ : 50 कोटी, रामोशी समाजासाठी उमाजी नाईक महामंडळ :50 कोटी, वडार समाजासाठी मारुती चव्हाण महामंडळ : 50 कोटी दिले. पण ब्राह्मण समाजासाठी मात्र परशुराम विकास महामंडळ दिले नाही. याचं स्पष्टीकरण देताना अमृत योजना दिली, असं सांगण्यात आलं. अमृत योजना पण ती सर्वच खुल्या प्रवर्ग साठी आहे… त्यात सगळेच दावा सांगणार

इतर समाजांसाठी विरोध नाही पण…
इतर समाजाला शासन करत असलेल्या सहकार्यला आमचा विरोध नाही, त्याचे स्वागतच आहे. पण हे सर्वच समाज या आधी सुद्धा कोणत्या ना कोणत्या विकास महामंडळात लाभार्थी होतेच की ? मग वेगळं परशुराम महामंडळ का नाही ? मुळात असं सामाजिक विघटिकरण करण्यापेक्षा सर्वच जातींच्या गरजूसाठी एकच महामंडळ असावं या मताचे आम्ही आहोत, अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी व्यक्त केली आहे.