कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव मांडताच पीडीपीच्या खासदारांनी आपला कुर्ता फाडला

0
623

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ( सोमवारी) राज्यसभेत जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव मांडताच पीडीपीचे खासदार एमएम फय्याज आणि नाझीर अहमद लावे यांनी संसदेत गदारोळ सुरु केला. दोघांनी संविधानाच्या प्रती फाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर पीडीपीच्या दोन्ही खासदारांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. प्रस्तावाला विरोध करण्यासाठी म्हणून एमएम फय्याज यांनी संसदेच्या परिसरात आपला कुर्ता फाडून घेतला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत काश्मीरच्या विषयावर निवेदन करताना जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याची शिफारस मांडली. अमित शाह यांनी ही शिफारस मांडताच संसदेत मोठया प्रमाणावर गदारोळ झाला.

केंद्र सरकारने संसदेत जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला. आतापर्यंत लडाख जम्मू-काश्मीरचा हिस्सा होता. प्रस्तावानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव आहे. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासून मागणी होती असे अमित शहा म्हणाले.