कर्नाटकातील मुख्यमंत्री येडीयुरप्पांचे सरकार अडचणीत, नेतृत्व बदलाच्या हालचाली

0
211

बंगळुरु, दि. २० (पीसीबी) : कर्नाटकात जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेसची राजवट उलथवून सत्तेत आलेले भाजप सरकार पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आल्यामुळे अस्थिर झाले आहे. भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले आहे. या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली जाऊ शकते.

भाजप आमदार बासनगौडा यत्नाल यांनी मंगळवारी येडियुरप्पा यांच्यावर टीकेची तोफ डागली. भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर नाराज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्याचा पुढचा मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकचा असेल, असे म्हटले होते. येडियुरप्पा आमच्यामुळे मुख्यमंत्री झालेत. उत्तर कर्नाटकमधील जनतेने भाजपचे 100 आमदार निवडून दिले होते, असे यत्नाळ यांनी म्हटले. तसेच भाजपश्रेष्ठीही येडियुरप्पा यांच्या कामगिरीवर नाखुश आहेत. त्यामुळे येडियुरप्पा दीर्घकाळ मुख्यमंत्रिपदावर राहणार नाहीत, असेही यत्नाळ यांनी सांगितले.

यापूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने जनता दलाला (सेक्युलर) पाठिंबा देत डी. कुमारस्वमी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले होते. मात्र, नंतरच्या काळात काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीमुळे अनेक आमदार फुटले. हे आमदार भाजपला जाऊन मिळाले होते. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा भाजपचे सरकार आले होते. या सरकारची धुरा येडियुरप्पा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीवर भाजपमधील एक मोठा गट नाराज असल्याची चर्चा आहे. या गटाकडून आता बी.एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह कर्नाटकातील हा असंतोष कशाप्रकारे शांत करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.