नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत – चंद्रकांत पाटील

0
138

पुणे, दि. २० (पीसीबी) : भाजपचे ज्येष्ठ पण नाराज असलेले नेते नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. ते लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे. पण या सर्व शक्यता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळल्या आहेत. “नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची मनधरणी सुरु आहे,” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, दुसरीकडे नाथाभाऊंच्या समर्थकांनी आता जळगावहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान ठेवले असून भाजपचे कमळ चिन्ह होर्डींगवरून हटविले आहे. त्यामुळे २२ ऑक्टोंबर रोजी खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश नक्की असल्याची चर्चा आहे.

“नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाचं नुकसान होईल असं ते वागणार नाहीत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते पुन्हा सक्रिय होतील. त्यामुळे इतरांचा हिरमोड होईल,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेऊ शकतात. त्यांनी धावता प्रवास करण्याची गरज नाही. कोरड्या प्रवासातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा. पंचनामे करण्याचीही गरज नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी, केंद्रकडून जे मिळेल ते बोनस समजायचं,” असा टोलाही त्यांनी लगावला.