राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष प्रवेशाबाबत एकनाथ खडसे म्हणतात…

0
269

मुंबई, दि. २० (पीसीबी) – भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत चर्चेला उधाण आले आहे पण एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीत जात नसल्याचं सांगितलं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले, “मी उद्या मुंबईत येत नाहीय. 22 तारीख ठरली नाहीय. हे सर्व मीडिया ठरवत आहे. काही असेल तर मी स्वत:हून जाहीर करेन. ज्या अर्थी मी गावात आहे त्याचा अर्थ काय? गुरुवारी प्रवेश आहे असा कोणताही विषय नाही.” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुरुवारी प्रवेश करण्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.

भाजपात नाराज असलेले एकनाथ खडसे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आज (20 ऑक्टोबर) सकाळपासून होऊ लागली. मुक्तानगरमधून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले अशाही बातम्या येत होत्या. पण खडसेंनी सध्यातरी असे काही नाही सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यांसदर्भात सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “एकनाथ खडसे यांच्याबाबत मी दोन दिवसांत बोलेन.” यामुळे येत्या काही दिवसांतच खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

18 ऑक्टोबरला खडसेंनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचीही चर्चा सुरू झाली होती मात्र बीबीसी मराठीशी बोलताना स्वतः खडसे यांनी यासंबंधीचं वृत्त फेटाळून लावलं.