कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही; शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचंय- उद्धव ठाकरे

0
794

इस्लामपूर, दि. १५ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपूर येथील प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेससह बंडखोर-अपक्षांवर टीकास्त्र सोडतानाच, शेतकरी समस्या आणि कर्जमाफी आदी मुद्द्यांवर भर दिला. मला शेतीतले काही कळत नाही आणि ते मला समजूनही घ्यायचे नाही. पण शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू मला दिसतात ते पुरेसे आहे. कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही. मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रण तापले आहे. प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये आज प्रचार सभा झाली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बंडखोर आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांवर तोफ डागली. तसेच या सभेत त्यांनी शेतकरी प्रश्न आणि कर्जमाफीसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. मला शेतीतले काही कळत नाही आणि ते मला समजूनही घ्यायचे नाही. पण शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू मला दिसतात आणि माझ्यासाठी ते पुरेसे आहे, असे ते म्हणाले. कर्जमाफी हा शब्द मला पटत नाही. मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे आहे, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात किमान दहा हजार रुपये देण्याचं आश्वासन त्यांनी या सभेत दिले.