”मोदींचे सरकार असेपर्यंत युवकांना रोजगार मिळणार नाही”

0
367

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची आज (मंगळवार) यवतमाळ येथील वणी येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरादार टीका केली. मोदींचे सरकार जोपर्यंत राहील, तोपर्यंत भारतातील युवकांना रोजगार मिळणार नाही, मोदी हे अंबानी व अदाणीचे लाउडस्पीकर आहेत असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले. शिवाय, जीएसटी व नोटाबंदीवरूनही त्यांनी मोदी सरकारला खडेबोल सुनावले.

याप्रसंगी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुरेश धानोरकर आदींसह काँग्रेसचे उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, प्रत्येक बँक खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातील, त्या अगोदरच्या निवडणुकीत सांगितले होते की, प्रत्येक बँक खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील. तुम्हाला हे पैसे मिळाले का? नाही ना. कारण, ज्या ठिकाणी ते जातात काहीना काही खोटं बोलतात. योग्य मुद्यांवरून तुमचे लक्ष दूर केले जाते. कधी चंद्राबद्दल बोलतील, कधी कलम ३७० बद्दल बोलले जाईल, कधी जिम कार्बेट पार्कमध्ये चित्रीकरण करतील. मात्र, जे तुमच्या समोर मुद्दे आहेत, ज्या तुमच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांसमोर जे प्रश्न आहेत, तरुणांसमोर जे बेरोजगारीचे आव्हान आहे, त्याबद्दल मोदी कधीच एक शब्दही बोलणार नाहीत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले का? जर कर्ज माफ झाले नसेल, तर मग एवढा पैसा जातो कुठं? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच, काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी कार्पोरेट टॅक्स माफ केला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या १५ जणांचा १ लाख २५ हजार कोटी रुपयांचा टॅक्स एक दिवसात माफ करण्यात आला. मागील पाच वर्षात पाच लाख ५० हजार कोटी रुपये भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजकांचे कर्ज माफ केले गेले. उद्योजकांची कर्ज माफ होतात मग शेतकऱ्यांची कर्ज का माफ होत नाहीत? असे त्यांनी विचारले. तसेच, हिंदुस्थान पेट्रोलियम व एअर इंडियाचे खासगीकरण केले जात आहे. हळूहळू संपूर्ण देश या १५ -२० उद्योजकांच्या स्वाधीन केला जात असल्याचेही राहुल म्हणाले.