दि. २३ (पीसीबी) – करुणा धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. शिवशक्ती सेना असं त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आहे. हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका हा पक्ष लढवणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच भ्रष्टाचारमुक्त आणि समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.“महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे घोटाळे होतात. घोटाळ्यामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढवणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत. एक-एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा आहे. त्यासाठी माझा पक्ष काम करेल,” अशी घोषणाही मुंडे यांनी केली. भ्रष्टाचार मंत्री करतात आणि अधिकारी, पोलीस अधिकारी बळी दिले जातात, हे मी २५ वर्ष पाहिलेले आहे. त्यामुळे आता हे संपवायचे असल्याचे त्या म्हणाल्या.