कपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या

818

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली होती. अनेकांनी हार्दिक पांड्याच्या समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५ बळी घेत हार्दिकने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. याचसोबत हार्दिकने भारताचे माजी खेळाडू कपिल देव यांच्याशी होत असलेल्या आपल्या तुलनेबद्दलही आपले मत मांडले आहे.

“कोणत्याही खेळाडूशी तुलना करण्यात काहीच गैर नाही. मात्र एखाद्या सामन्यात जर माझ्याकडून हवीतशी कामगिरी होऊ शकली नाही तर लगेच माझ्यावर टीका सुरु होते. मला कधीच कपिल देव बनायचे नव्हते. मी हार्दिक पांड्या आहे आणि मला हार्दिक पांड्याच राहू द्या”, असे म्हणत हार्दिकने कपिल देव यांच्यासोबत आपली तुलना करु नका असे आवाहन केले आहे. तो एका वृत्त्ववाहीनीशी  बोलत होता.

“कपिल देव एक सर्वोत्तम खेळाडू होते. आपल्या मेहनतीने त्यांनी त्यांचे विश्व निर्माण केले होते. मलाही माझ्या मेहनतीवर माझे नाव मोठे झालेले पहायचे आहे. त्यामुळे यापुढे माझी कोणत्याही खेळाडूशी तुलना झाली नाही तर मला आनंद होईल.” हार्दिकने आपले परखड मत मांडले. दुसऱ्या डावात हार्दिक पांड्याने इंग्लंडचा निम्मा संघ गारद करत भारताला सामन्यावर वर्चस्व मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला होता.