औरंगाबाद खंडपीठाने बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे काम तात्पुरते थांबवले

0
160

औरंगाबाद, दि.२३ (पीसीबी) : औरंगाबाद खंडपीठाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनेक झाडं तोडून औरंगाबादेतील प्रियदर्शनी उद्यानामधील स्मारक उभं करण्याची योजना आहे. अनेक पर्यावरणप्रेमींनी या उद्यानातील झाड तोडून स्मारक उभं करण्याच्या योजनेला विरोध दर्शवला होता. त्यामुळे ‘प्रियदर्शनी बचाव’ मोहीम सुरु झाली. या मोहिमेची दाखल घेत न्यायालयाने कामाची पाहणी केली आणि अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतरच औरंगाबाद खंडपीठ पुढील निर्णय देणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रियदर्शनी उद्यानातील 1215 झाडे गेली कुठे असा प्रश्न उपस्थित झाला. वृक्षतोड रोखण्यासाठी याआधी जनहित याचिका दाखल केलेली होती. बांधकाम करत असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते परंतु याचे पुनर्रोपण केले जात नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते. बाळासाहेबांच्या या स्मारकाच्या प्रकल्पाला सुमारे तब्बल ६४ कोटी खर्च करण्यात येत असून या उद्यानाचा एकूण परिसर १७ एकर आहे. तर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी १,१३५ चौरस मीटर जागा व्यापली जाणार आहे. तर पुढच्या काही वर्षात म्हणजे 2025 साली बाळासाहेबांच्या स्मारक उभारणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डिसेंबर २०२० मध्ये केली होती.