ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या घरावर गोळीबार; ७२ तासांतील दुसरा हल्ला, दोन आरोपी गजाआड

0
2

हिट लिस्ट मध्ये अनेक “एआय” अधिकारी

सॅन फ्रान्सिस्को/प्रतिनिधी: जगप्रसिद्ध आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी ‘ओपन एआय’ (चॅट जीपीटी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांच्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील निवासस्थानाबाहेर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.

भारतीय वेळेनुसार १२ एप्रिल रोजी दुपारी साधारण २:१० वाजता ऑल्टमन यांच्या घराबाहेर एका कारमधून आलेल्या व्यक्तींनी अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून वेगाने फरार झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी परिसरातील सीसीटीवी फुटेज तपासल्यानंतर आरोपींच्या कारचा क्रमांक मिळवला. या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी अमांडा टॉम (२५) आणि मुहम्मद तारिक हुसैन (२३) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत पोलिसांनी तीन शस्त्रे जप्त केली आहेत. सध्या या दोघांची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या हल्ल्यात आरोपीचा उद्देश, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेल्या ऑल्टमन यांची हत्या करणे हा होता. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबद्दलच्या त्याच्या तीव्र द्वेषातून हे कृत्य घडले होते. सरकारी वकिलांचे म्हणणे आहे की, हा हल्ला कोणत्याही उत्स्फूर्त भावनेतून नव्हे, तर तो पूर्वनियोजित होता.
पोलिसांनी हल्ल्याच्या संशयिताकडून एक हिट लिस्ट सापडली आहे, ज्यातून त्याच्या इराद्यांची संपूर्ण कल्पना येते. या दस्तऐवजात एका ‘एआय’ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची हत्या करण्याच्या योजनेची रूपरेषा मांडण्यात आली आहे; याव्यतिरिक्त, इतर अनेक ‘एआय’ क्षेत्रातील अधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य आणि गुंतवणूकदार यांची नावे व पत्तेही यात नमूद करण्यात आले होते.

सॅम ऑल्टमन यांच्या घरावर झालेला हा ७२ तासांतील दुसरा हल्ला आहे. याआधी १० एप्रिल रोजी दुपारी ४:१० वाजता एका व्यक्तीने त्यांच्या घरावर ‘मोलोटोव्ह कॉकटेल’ (पेट्रोल बॉम्ब) फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सतर्क सुरक्षा रक्षकांमुळे त्यावेळी मोठा अनर्थ टळला होता. या लागोपाठच्या दोन हल्ल्यांमुळे ऑल्टमन यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर सॅम ऑल्टमन यांनी एआय तंत्रज्ञानाबद्दल वाढत्या चिंतांवर भाष्य केले. ते म्हणाले, “नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांच्या मनात भीती आणि चिंता असणे स्वाभाविक आहे. मात्र, या विषयावर संतुलित आणि समंजसपणे विचार करणे आवश्यक आहे.” पोलीस या दोन्ही हल्ल्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, तसेच यामागे काही मोठे कारस्थान आहे का, या दिशेने अधिक तपास करत आहेत.