दि.१५(पीसीबी)-राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत पार पडल्या. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 सर्वाधिक चर्चेत राहिला. या प्रभागातून एमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एन्ट्री केली. पालिकेच्या निवडणुकीनंतर सहर शेख यांच्या कैसा हराया…या डायलॉगची ठाणे, मुंबईसह राज्यभर चर्चा रंगली होती. आता याच सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे.
एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले. निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली. सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे. सहर शेखकडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशातील गाजियाबादची मूळ रहिवासी युनूस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला. त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या.
नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला
ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दिकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला. त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्धीकी अहमद यांनी केली आहे. ठाणे तहसीलदारांना प्राप्त तक्रारीनुसार 18 मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचे कारण देत युनूस गैरहजर होते सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची कलर प्रिंट व काही कागदपत्र सादर केले. 23 मार्चला पुन्हा सुनावणी घेण्यात आली तेव्हा ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात प्रमाणपत्र दाखल्यामधील त्रुटी काढल्या. तर ठाण्याच्या रहिवासी असलेल्या सहर शेख ने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात सहर शेख आणि तिच्या वडिलांना एबीपी माझा ने संपर्क केला असता अध्याप संपर्क होऊ शकला नाही.














































