दि. १५(पीसीबी) -राज्यात महिलांवरील आणि लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पिंपरी चिंचवड शहरातून एक संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 47 वर्षीय आरोपीला अटक केली असून विजय भोसले असे त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास आरोपीने चिमुरडीला आंबा देण्याचे आमिष दाखवून आपल्या खोलीत बोलावले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने तिच्या पालकांनी तातडीने तिला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. आईने विश्वासात घेऊन विचारल्यानंतर चिमुरडीने घडलेला प्रकार सांगितला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. काळेवाडी पोलिसांनी तत्पर कारवाई करत एक पथक रुग्णालयात तर दुसरे आरोपीच्या घरी पाठवून त्याला अटक केली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले.दरम्यान, या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई आणि कडक शिक्षेची मागणी नागरिकांकडून होत आहे. समाजानेही सतर्क राहून आपल्या परिसरातील लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.














































