दि.१५(पीसीबी) : पश्चिम बंगालच्या सत्तेसाठी राजकीय वातावरण तापले असताना भाजपने ‘मिशन बंगाल’ला वेग दिला आहे. या मोहिमेत आता महाराष्ट्र भाजपही सक्रिय झाल्याचं चित्र दिसत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी रणनीती आखली जात आहे.याचाच एक भाग म्हणून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून पश्चिम बंगालसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 एप्रिल रोजी ही विशेष रेल्वे सुटणार असून मुंबई आणि पुण्यातील सुमारे 7 हजार मतदारांना मतदानासाठी त्यांच्या गावी पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कामासाठी आलेल्या पश्चिम बंगालमधील असंघटित कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून भाजपकडून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक दोन टप्प्यांत पार पडणार आहे:
पहिला टप्पा : 23 एप्रिल
दुसरा टप्पा : 29 एप्रिल
निकाल : 4 मे 2026
या निवडणुकीसाठी राज्यातील मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेतेही प्रचारासाठी बंगालमध्ये जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपच्या प्रमुख घोषणा काय आहेत?
बेरोजगार तरुणांना दरमहा ₹3000 मदत
पहिल्या सहा महिन्यांत समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याचा संकल्प
महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पथक
शेतकऱ्यांसाठी हमीभाव योजना, धान खरेदी ₹3100 प्रति क्विंटल
घुसखोरी आणि गायींच्या तस्करीवर कठोर कारवाई
टीएमसी सरकारच्या भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडवून आणण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून, या विशेष रेल्वेच्या निर्णयामुळे निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.













































