पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रथमच IAS कुलदीप जंगम यांची नियुक्ती

0
2

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी पहिल्यांदाच सनदी अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सुभाष उमारणीकर यांनी जारी केला आहे. दरम्यान, महापालिकेत तिन्ही अतिरिक्त आयुक्त कार्यरत असताना जंगम यांचा आदेश आल्याने प्रशासनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका ‘ब’ वर्गामध्ये असून नवीन आकृतीबंधानुसार तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिकाऱ्यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली. सद्या मुख्याधिकारी संवर्गातील विजय खोराटे, तृप्ती सांडभोर आणि ग्रामविकास विभागाचे विक्रांत बगाडे अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत आहेत.

तिन्ही अतिरिक्त आयुक्त राज्यसेवेतील असून स्थानिक अधिकाऱ्यांच्या जागेवरही राज्य सेवेतीलच अधिकारी आहे. त्यापैकी खोराटे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे. त्यांची सात जुलै २०२३ रोजी अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. राज्य शासनाने महापालिकांमधील अतिरिक्त आयुक्तांच्या नियुक्तीबाबतची कार्यपद्धती फेब्रुवारी महिन्यात निश्चित केली आहे.

त्यानुसार महापालिकेच्या तीन अतिरिक्त आयुक्तापैंकी एक अतिरिक्त आयुक्त भारतीय प्रशासकीय सेवेतील देण्याचा शासन निर्णय झाला होता. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. परंतु, जंगम यांची नेमकी कोणाच्या जागी नियुक्ती झाली हे आदेशात स्पष्ट नाही. तिन्ही अतिरिक्त आयुक्त कार्यरत असल्याने प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे