एका हातात विष, दुसऱ्या हातात अमृत, काय घ्याल? उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या खासदार, आमदारांना सवाल

0
1216

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – भाजपसोबत युती करायचे की नाही यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांची शुक्रवारी मुंबईत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तुमच्या एका हातात विषाचा प्याला आहे, दुसऱ्या हातात अमृताचा, तुम्ही कोणता घ्याल? असा भावनिक सवाल केला. त्यावर सर्व खासदार आणि आमदारांनी तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असेल, असे उत्तर दिले. त्यामुळे शिवसेना लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती न करता स्वतंत्र लढेल, असा कयास बांधला जात आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करून ही निवडणूक लढवणार आहे. या दोन्ही पक्षांत जागा वाटपाची अंतिम बोलणी सुरू आहे. दुसरीकडे केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही हे स्पष्ट होत नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत पक्षाचे खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक घेत भाजपसोबत युती करायची की नाही यावर चर्चा केली.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी तुमच्या एका हातात विषाचा प्याला आहे, दुसऱ्या हातात अमृताचा, तुम्ही कोणता घ्याल?, असा भावनिक सवाल पक्षाच्या खासदार आमदारांना केला. त्यावर सर्व खासदार आणि आमदारांनी तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असेल, असे उत्तर दिले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत युती करणार नसल्याचा कयास बांधला जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक आहेत. युती करूनच निवडणुकांना सामोरे गेल्यास भाजप आणि शिवसेनेचा फायदा होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे.