एकही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी भाजपकडून मोफत महाआरोग्य शिबीर – डॉ. प्रमोद कुबडे

0
524

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – राज्यातील कोणताही गरीब रुग्ण कितीही मोठा आजार झाला असला तरी उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोफत महाआरोग्य शिबीरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आजार झालेल्या रुग्णापर्यंत पोचण्याचा या महाआरोग्य शिबीरांचे उद्देश असल्याचे भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. प्रमोद कुबडे यांनी गुरूवारी (दि. २०) सांगितले.

जिजाई प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पिंपरीतील बी. टी. अडवाणी हॉलमध्ये आयोजित मोफत महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, आयटी सेलचे शहराध्यक्ष नेहुल कुदळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. प्रमोद कुबडे म्हणाले, “माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात रोज कुठे ना कुठे मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्याचे ठरवले. आतापर्यंत अशा प्रकारची अनेक महाआरोग्य शिबीरे घेण्यात आली आहेत. त्यामध्ये लाखो गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. अशा रुग्णांना कोणताही आजार असला तरी त्याची तपासणी आणि त्यावर उपचार मोफत करण्यात आले आहेत. पैसे नाहीत म्हणून आजार झालेला एकही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, ही राज्य सरकारची आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. त्यासाठीच पिंपरीमध्ये हे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुढील सात दिवस हे महाआरोग्य शिबीर आयोजित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

ज्येष्ठ नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे म्हणाल्या, “माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात आरोग्य सहभागी होणाऱ्या रुग्णांनी आपल्या शेजारच्या व ओळखीच्या नागरिकांनाही या आरोग्य शिबीराची माहिती द्यावी आणि त्यांना निरोगी आरोग्य लाभण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप आयटी सेलचे शहराध्यक्ष नेहुल कुदळे यांनी केले. या शिबिरात ह्दयरोग, न्युरो सर्जरी, मूत्रपिंड विकार, अस्थिरोग सर्जरी, कानाचे निदान, जनरल सर्जरी, डोळ्यांचे विकार आदी रोगांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे एक हजार रुग्ण सहभागी झाले होते.