उन्नाव बलात्कार पीडितेचा रुग्णालयात मृत्यू

0
599

दिल्ली, दि.७ (पीसीबी) – उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती ९० टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ११.४० च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

कार्डिअॅक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. यापूर्वी तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून तिच्यावर हल्ला केला होता. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. पीडित महिला जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आले. यावेळी काही जणांनी पीडितेची मदत करण्यासाठी धाव घेतली. मात्र आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिकांनी फोन करुन या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.