जिल्ह्यात महाविकास आघाडीमुळे कार्यकर्त्यांची कोंडी

0
360

रायगड, दि.७ (पीसीबी) – राज्यातील नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमुळे रायगड जिल्ह्य़ातील राजकीय समिकरणे पूर्णत: बदलली आहेत. आजवर ज्या पक्षांविरोधात निवडणुका लढविल्या त्यांच्याच बरोबर एकत्र बसण्याची वेळ आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

रायगड जिल्ह्य़ातील सातही मतदारसंघात स्थानिक राजकीय स्थिती वेगळी आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला ही महाविकास आघाडी फारशी फायदेशीर नाही. कारण महाडमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहेत. कर्जत आणि श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेचा कट्टर विरोधक आहे. अलिबाग आणि पेणमध्ये शिवसेनेचा शेकापशी टोकाचा संघर्ष आहे. या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेस आणि शेकापचेही सख्य नाही. अशा परिस्थितीत एकेकाळच्या विरोधकांना परस्परांशी जुळवून घेताना ‘महा’ अडचण निर्माण होणार आहे.

शिवसेनेने श्रीवर्धन आणि कर्जत मतदारसंघांत राष्ट्रवादीविरुद्ध  निवडणूक लढवली. कर्जतमधून शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांना पराभूत केले, तर श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी सेनेच्या विनोद घोसाळकर यांचा पराभव केला. महाडमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर झाली. यात सेनेच्या भरत गोगावले यांनी बाजी मारली. अलिबागमध्ये शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेकापच्या सुभाष पाटील यांचा पराभव केला. आता या चारही मतदारसंघांत एकमेकांविरोधात निवडणूक लढवणारे हे पक्ष एकत्र आले आहेत. ही महाविकास आघाडी पाच वर्षे टिकली आणि भविष्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास जागावाटपात अभूतपूर्व गोंधळ होण्याची शक्यता आहे.