“उध्दव साहेब, झाले गेले विसरून जा…, नेताजी पालकर व्हा !”: थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
823

मुकेश अंबानी यांच्या घरा जवळ उभ्या असलेल्या गाडीत जिलेटिन कांड्या सापड्याने एकच खळबळ उडाली होती. गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर सहपोलिस निरीक्षक संजय वाजे यांचा एकूण घटनाक्रमातील सहभाग स्पष्ट झाला आणि राजकारण पेटले. भाजपाने त्यात सुरवातीला शिवसेनेला टार्गेट केले. पुढे चौकशीअंती मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाली. दोनच दिवसांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी कलेक्शनचा लेटर बॉम्ब फोडला. त्यातून मोठा भूकंप झाला आणि राजकारणाचा भडका उडाला. आता भाजपाचे टार्गेट बदलले, ते राष्ट्रवादी आणि महाआघाडी सरकार झाले.

परमबीर सिंह यांनी त्यांच्या पत्रात ‘देशमुखांच्या प्रतापांबद्दल मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना अवगत केले होते,’ असे म्हटले आहे. याचा नेमका अर्थ जनतेला बरोबर समजला. त्यामुळे महाआघाडी सरकारची आता खैर नाही. ‘शेंडी तुटो नाहीतर पारंबी.’ भाजपाने या तापल्या तव्यावर पोळी भाजून घेतली तर त्यात गैर असं काहीच नाही. त्यासाठीच आता राज्यभर आंदोलनातून रान पेटवले जाते आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा आज उद्या होईल. पण त्यानंतरही या प्रकरणावर पडदा पडेल असे वाटत नाही. या घडामोडींचे आगामी काळात राजकीय परिणाम संभवतात आणि त्याचे विश्लेषण आम्हाला खूप महत्वाचे वाटते.

‘राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेच्याही अब्रुचे धिंदवडे’ –
चक्राऊन टाकणारे (महिन्याला १०० कोटी, वर्षाला १२०० कोटी रुपये) आकडे आणि सरकराचा खोटेपणा या पूर्ण घटनेतून समोर आल्याने जनमतसुध्दा आता सरकर विरोधात आहे. आता ते भाजपाच्या बाजुने सरकले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जे ट्विट केले त्यातून अनेक राजकीय अर्थ निघाले. त्यानंतर पाहिले तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेबद्दलचा सूर काहीसा बदलला आहे. राऊत यांच्या ट्विट मध्ये पश्चाताप ध्वनीत झाल्याने फडणवीस यांनीही वारे कोणत्या दिशेने वाहते ते ओळखले.

पाठोपाठ “उध्दवसाहेब, शरद पवार हे शिवसेना संपवायला निघाले आहेत”, हा चंद्रकांत पाटील यांचा अत्यंत सावधानतेचा इशारासुध्दा बोलका आहे. महिलेच्या आत्महत्या प्रकऱणात गंभीर आरोप झाले म्हणून अखेर मंत्री संजय राठोड यांचा शिवसेनेने राजीनामा घेतला, पण धनंजय मुंडे प्रकऱणात राज्यभर असंतोषचा भडका उडूनसुध्दा राष्ट्रवादीने त्यांना अभय दिले. आता अनिल देशमुख यांच्या प्रकऱणातही राष्ट्रवादीची भूमिका ‘ठंडा करके खाओ’ अशी आहे. या प्रकऱणात अनिल परब यांच्यावरही ताशेरे असल्याने देशमुख गेले तर त्यांचीही गच्छंती अटळ आहे. एकूणच काय तर फडणवीस यांच्या सारख्या चाणाक्याने वाजे आणि परमबीर सिंहरुपी दगडाने अनेक पक्षांची शिकार केली. त्यात राष्ट्रवादीच्या बरोबर शिवसेनेचीही अब्रू वेशीवर टांगली, अक्षरशः धिंदवडे निघालेत. ठाकरे यांच्यावर आता, वसुली सरकारचे शिलेदार असे गलिच्छ आरोप सुरू झालेत. मांगल्याचे प्रतिक असलेल्या स्वर्गिय मीनाताई ठाकरे यांचे गूण अंगी उतरलेले संवेदनशील, सुशिल असे व्यक्तीमत्व उध्दव ठाकरे हे गेंड्याच्या कातडीचे नाहीत आणि त्यांना हे सहन होईल, असे वाटत नाही. असंगाशी संग केला तर काय होते याचा दीड वर्षांचा अनुभव त्यांना पुरेसा असावा. भाजपाची मंडळी आता या चिमन्यांनो परत फिरा, असे खुणावतात. त्यामुळे झाले गेले विसरून असे अनैसर्गिक जगण्यापेक्षा नैसर्गिक जगा, असे सैनिक म्हणतात.

हिंदवी स्वराज्याची शपथ घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार नेताजी पालकर हे मोगलांना मिळाले होते. महाराजांना खूप वाईट वाटले होते. नेताजी पालकर चुकले होते. नंतर त्यांची चूक त्यांनाच उमगली आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी पुन्हा स्वधर्म स्विकारला. महाराजांनी नेताजी पालकर यांना माफ केले आणि पुन्हा स्वधर्मात आणले. शिवसेनेचे सर्वेसर्वा ठाकरे स्वतः आपल्या सैंन्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाले हे महाराष्ट्राच्या रयतेलाही रुचलेले नाही. आजच्या राजकीय परिस्थितीत इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. काश्मीर, ३७० कलम, राम मंदिर आदी विषयांवर शिवसेनेने किती उसणे अवसाण आणले होते. हिंदुत्वाला तिलांजली देत ज्या काही निर्णयांत तडजोडींची वेळ आली त्यातही शिवसेनेची किती कसरत झाली, कोंडी झाली ते लोकांनी पाहिले. श्वास गुदमरतोय हे आता उघडउघड दिसते. अशा परिस्थितीत मोकळे व्हायचे तर कोण मुख्यमंत्री? हा विषय गौण आहे. थोडे पुढे मागे करा, अन्यथा आगामी काळात शिवसेनेची वाट बिकट दिसते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ थोडा उलगडून सांगतो. ‘तुम्ही उंटाला घरात घेतले, तर तो तुम्हालाच घराबाहेर काढील अन्यथा तुमचे घरच मोडून टाकेल,’ हे लक्षात घ्या. आणि सावध व्हा…