इंद्रायणीनगरमध्ये जिजाई प्रतिष्ठानच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाण्याच्या कृत्रिम हौदात ९ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

0
479

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड महापालिका ’क’  प्रभाग आरोग्य विभाग आणि जिजाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणीनगर सेक्टर ६ जळवायू विहार शेजारील मैदानावर गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम पाण्याच्या हौदाची व्यवस्था करण्यात आली होती. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि पिंपरी-चिंचवड शहर भाजप सरचिटणीस  सारंग कामतेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम २०१७ पासून राबविण्यात येत आहे.  

पिंपरी- चिंचवड महापालिका आणि जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने नदीतील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पाण्याच्या हौदाची व्यवस्था करण्यात आली.  या हौदामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करून नदीचे प्रदूषण रोखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्यास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

गेली अकरा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पुजा केल्यानंतर गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… या जयघोषात बाप्पांना गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. गुरूवारी कृत्रिम हौदात सुमारे ८ हजार ८०७  गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर २० टन निर्माल्य कुंडात जमा करून या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

हा उपक्रम २०१७ पासून राबविण्यात येत आहे. त्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.    २०१७ मध्ये ८४६, २०१८ मध्ये ९१७  तर यंदा ८ हजार ८०७  गणेशमूर्तींचे  कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. तसेच २० टन निर्माल्य कुंडात जमा करून नागरिकांनी सहकार्य केले. या कामी आरोग्य निरीक्षक  विजय दवाळे, दगडू लांडगे, मुकादम सचिन गव्हाणे, दिलीप बांगर आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.