‘तुझेही उन्नाव पीडितेप्रमाणे हाल करू’; बसपा खासदाराची युवतीला धमकी

0
395

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी)- तुझेही उन्नाव पीडितेप्रमाणे हाल करू, अशी धमकी बहुजन समाज पार्टीचे खासदार अतुल राय यांनी एका युवतीला दिली आहे. सदर महिलेने अतुल राय यांच्यावर बलात्काराचा खटला दाखल केला आहे. तसंच तुझेही उन्नाव पीडितेप्रमाणेच हाल करू अशी धमकी अतुल राय आपल्याला देत असल्याचा आरोप सदर महिलेने एका व्हिडीओद्वारे केला आहे. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

सदर युवतीने खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी राय हे सध्या तुरूंगात आहेत. तसंच तुरूंगात असल्यामुळे त्यांनी अद्यापही खासदारकीची शपथ घेतलेली नाही. दरम्यान, बलात्काराच्या कथित पीडितेचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्या युवतीने अतुल राय हे आपल्याला, आपल्या कुटुंबीयांना आणि साक्षीदारांना धमकी देत असल्याचा आरोप केला आहे. तसेच तिने पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. आपल्या वकीलांविरोधात खोटा खटला दाखला करण्यात आला आहे. तसेच तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर आपलेही उन्नाव प्रकरणातील पीडितीप्रमाणे हाल केले जातील, अशी धमकी दिली असल्याचा आरोपही तिने केला आहे.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक संजय यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची माहिती घेण्यात येत असून या प्रकरणाची चौकशीही करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तसेच पीडित युवतीच्या संरक्षणाची जबाबदारी ही पोलिसांची असून संबंधित पोलीस ठाण्यांना तिच्या सुरक्षेसाठी योग्य ते निर्देश देण्यात आले आहे. तिच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.