आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला; पियुष गोयल यांचे विधानावर सोशल मीडियावर खिल्ली

0
395

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन चर्चेचा विषय बनले आहेत. त्यातच आईन्स्टाईन यांनी आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कधीच लावला नसता, असे वक्तव्य रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. न्यूटनची थिअरी आईन्स्टाईन यांच्या नावावर खपवल्याने गोयल यांच्या या विधानाची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे.

सध्याचा आर्थिक विकास दर पाहता भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटीची कशी बनणार या प्रश्नावर पियुष गोयल म्हणाले की, “तुम्ही त्या हिशेबात जाऊ नका जे टीव्हीवर पाहता. जर तुम्हाला पाच लाख कोटीची अर्थव्यवस्था बनवायची असेल तर देशाला सुमारे १२ टक्के दराने वाटचाल करावी लागेल, आज त्यात ६ टक्के दराने वाढ होत आहे. आकडे आणि गणितात जाऊ नका. आईन्स्टाईनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी अशा गणितांचा उपयोग कधीही झाला नाही.”

माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनीही पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘होय, मंत्रीजी. आईन्स्टाईनला गुरुत्वाकर्षणच्या शोधासाठी गणिताची कधीच गरज लागली नाही, कारण न्यूटनने आधीच शोध लावला होता. आता न्यूटनच्या खूप आधी आमच्या पूर्वजांना गुरुत्वाकर्षणाबद्दल सगळे माहित होते, हे मनुष्यबळ विकास मंत्री कधी बोलतात याची प्रतीक्षा आहे.